काव्यरंग

Meeting Details

Meeting Date 10 Dec 2022
Meeting Time 05:00:00
Location Soud Sohrab Hall Deenanath Mangeshkar Hospital .
Meeting Type Regular
Meeting Topic काव्यरंग
Meeting Agenda Synergy meeting
Chief Guest Dr Dhananjay and Mrs Rekhs Kelkar
Club Members Present 180
Minutes of Meeting काव्यरंग … रोटरी क्लबच्या शुक्रांगण परिवारातर्फे *"काव्यरंग"* हा उर्दू, हिंदी , मराठी कविता आणि गज़लेची मुशाफिरी हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सौदी बाहवान हॉल मध्ये २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित केला गेला होता. इतर दहा क्लब बरोबर आपला सहवास क्लब ही या कार्यक्रमातील एक आयोजक होता. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कविता-गजलांचा हा बहारदार कार्यक्रम सादर करणारे कुणी प्रथितयश कवी म्हणून गाजलेले नव्हते तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रमुख आणि नामवंत डॉ धनंजय केळकर आणि त्यांच्या पत्नी सौ रेखा केळकर यांनी हा कलात्मक कार्यक्रम रसिक रोटेरियन आणि नॉन रोटेरिअयन्स समोर सादर केला. कार्यक्रमाचे सादरीकरण चार टप्प्यात झाले - दोन भाग हिंदी-उर्दू गजलांचे जे सौ रेखा केळकरांनी सादर केले आणि डॉ धनंजय केळकरांनी मराठी कवितांचा रसास्वाद दोन भागात सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ धनंजय सरांनी कल्पना दिली की ते स्वतः कविता करत नाहीत पण कवितेची - साहित्याची आवड असल्यामुळे ते या कवितांवर बोलणार आहेत. डॉ धनंजयांच्या म्हणण्याप्रमाणे लेखक-कवीयांना सायन्स मध्ये रस नाही , तसंच सायन्स मधील - इंजिनियर-डॉक्टर वगैरे लोकांना साहित्यात रुची नाही. पण एक रसिक म्हणून किंवा आवड-छंद म्हणून जर साहित्याकडे डॉक्टर - इंजिनियर मंडळींनी साहित्याकडे पाहिलं तर त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा तर मिळेलच पण एक क्रिएटिव्हिटी पण निर्माण होण्यास मदत होईल. सौ रेखा या भोपाळच्या असल्यामुळे त्यांची मातृभाषा हिंदी आणि मराठी येत असलं तरी हिंदी-उर्दूचा प्रभाव थोडा जास्तच. याचुळे त्यांनी हिंदी आणि उर्दू कविता- गजलांचा आस्वाद उपस्थित रसिकांना दिला. रेखाजींच्या सादरीकरणात गज़लेबद्दल पुढील माहिती मिळाली - गझल एक वृत्तबद्ध काव्यप्रकार आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो. प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. गज़लचा जन्म अरबी काव्यात इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदर झाला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लाममध्ये तो रूढ झाला हे विशेष. तेराव्या शतकातील सूफी संत - ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती व भारतातले आक्रमणकर्ते खिल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी अमीर खुसरो यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अमीर खुसरो तर उर्दूतील पहिला शायर होता असं म्हणतात. गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा एक शेर असते. गझलेतील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. गझलेतला प्रत्येक शेर ही एक दोन चरणांची स्वतंत्र कविता असते. गझलेचे अनेक चरण असतात. एका गझलेत कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ठुमरी व टप्पा हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. हे विश्लेषण करताना सौ रेखाजींनी फैज अहमद फैज, निदा फाजली, अहमद फराझ, गालिब प्रभुतींच्या गजला गद्य स्वरूपात वाचून दाखवल्या आणि त्या सादर करताना प्रेक्षकांनाही सामील करून घेऊन कार्यक्रमात एक वेगळीच मजा आणली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी "दिल ए नादान तुझे हुवा क्या हे " या गज़लेचं व्याकरण समजून घेण्याचा प्रयत्न - डॉ धनंजय केळकरांच्या मराठी कविता सादरीकरणातून त्यांच्या साहित्यप्रेमाबरोबरच ज्वलंत राष्ट्रप्रेम -राष्ट्रवाद आणि हिंदू धर्माबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत होतंच पण कवितांबरोबरच त्या संदर्भात त्यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमधून त्यांच्या प्रभावी छायाचित्रणाची तयारी ही दिसली. त्यांनी विंदा करंदीकर, स्वा सावरकर ( ने मजसी ने सागरा तळमळला ) यांच्या कविता फार तळमळीने वाचून दाखवल्या. सावरकरांबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या इस्रायलच्या ट्रिप बद्दल आणि तिथल्या मसादा फोर्टच्या भेटीबद्दल सांगितलं. मसादाला ते गेले असताना तिथे तिथली शाळेतली काही मुलं आली आणि त्यांनी तिथे मेणबत्त्या लावून प्रार्थना केली. तेव्हा चौकशी केली असता डॉ केळकरांना कळालं की इथं त्या देशाची मुलं एकदा तरी येऊन देशासाठी सर्वस्व देण्याची शपथ घेतात. आपल्या देशात असा ज्वलंत राष्ट्रवाद कधी पेटणार हा मुद्दा त्यांनी मांडला. आई आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. आई वर रचलेल्या निदा फाजली (बेसन की सौन्धी रोटी पार खट्टी चटणी जैसी माँ ), संत जनाबाई (पक्षी जाय दिगंतरा), प्रा स ग पाचपोळ ( हंबरून वासराले ), कवी यशवंत (आई म्हणोनी कोणी), माधव ज्युलियन ( प्रेमस्वरूप आई ) या महान कवींच्या कविता डॉ केळकरांनी भारावलेल्या रसिकांना ऐकवल्या. सौ रेखा यांची ईवरची हिंदीतले कविताही त्यांनी ऐकवली. या कवितांच्या वेळी पक्षी, प्राणी यांच्या छयाचित्रातून आई- मुलाच्या नात्यातल्या भावना व्यक्त केल्या. कुसुमाग्रजांच्या कवितांचा विशेष उल्लेख करताना डॉ केळकरांनी "वेडात मराठे वीर दौडले सात " या कवितेच रसग्रहण करताना प्रतापराव गुर्जर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल, आणि विठोजी शिंदे या सात मर्द शिलेदारांनी नेसरी खिंडीत बहलोलखानाच्या पंधरा हजार फौजेवर तुटून पडून स्वराज्यासाठी प्राणांची आहुती कशी दिली याचं सुरेख वर्णन केलं. हे गाणं म्हणण्यासाठी पं हृदयनाथांनी लतादिदींनाच का निवडलं हा किस्साही त्यांनी सांगितला व काव्यातलं पहिलं कडवं गाळण्याची माहितीही दिली. कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या " खग सात जळाले, कोसळल्या उल्का सात, ताजमहाल , अही ...नकुल " अशा उपमांचं वर्णन करताना त्यांच्या पृथ्वीचे प्रेमगीत व इतर कवितांचा संदर्भ दिला. " वेडात मराठे वीर दौडले सात " आणि लॉर्ड टेनिसनच्या " The Charge of the Light Brigade " या कवितेतलं साधर्म्यही डॉ केळकरांनी वर्णन करून सांगितलं. प्राईड, सारसबाग , विस्डम , लोकमान्यनगर, हिल साईड , पाषाण, गणेश खिंड, ईस्ट, हेरिटेज, सिनर्जी , वेस्ट या क्लबबरोबर आपल्या सहवास क्लबने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील सौद बाहवान हॉल रसिक श्रोत्यांनी पूर्ण भरला होता आणि गजला व कवितांचा माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकून अनुभवून सुखावून पूर्णपणे भारावून गेला होता यात वाद नाही. रो राहुल लाळे सेक्रेटरी २२-२३ रोटरी सहवास